तडवळे सं.कोरेगाव येथील जयश्री पाटणकर यांचा समाजापुढे आदर्श
कोरेगाव दिनांक 13. : अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असलेल्या तडवळे संमत कोरेगाव येथील सौ.जयश्री दिलीप पाटणकर यांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळत वयाच्या ५९ व्या वर्षी दहावीच्या परीक्षेत तब्बल ५९ टक्के गुण मिळवून समाजापुढे व महिलांपुढे प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.जिद्द,मेहनत, चिकाटी असली तर जीवनात केव्हाही यश मिळवता येते,शिक्षणाला वयाची अट नसते, आम्ही स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीच्या लेकी आहोत हे स्वतःच्या कृतीतून सिद्ध केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,तडवळे संमत कोरेगाव येथील सौ.जयश्री पाटणकर या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असून कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि विविध कारणांमुळे त्यांचे पुढील शिक्षण थांबले होते.मात्र त्यांनी कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आपल्या तीनही मुलांना उत्तम संस्कार देत उत्तम नागरिक म्हणून घडवले.मोठे चिरंजीव निखिल पाटणकर हे भारतीय हवाई दलात कार्यरत आहेत.कन्या पल्लवी सचिन पवार या उच्च शिक्षण पूर्ण करून अमेरिकेत कार्यरत आहे,तर धाकटे चिरंजीव विपुल हे पुणे येथे व्यवसाय क्षेत्रात कार्यरत आहेत.जयश्री पाटणकर यांनी माहेरच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भुईंज येथे दहावी पर्यंत शिक्षण घेत असताना काही कारणास्तव दहावीची परीक्षा न देताच त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले.त्यांचे मोठे बंधू भगवान पवार हे भुईंज येथील एक प्रतिष्ठित व्यापारी आहेत.एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कोरेगाव,जिल्हा परिषद सातारा आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन द्वारा सेकंड चान्स प्रोग्राम उपक्रमांतर्गत महिलांना इयत्ता दहावी पूर्ण करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाल्यामुळे सौ.जयश्री पाटणकर यांना आपले अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळाली.शिक्षणाची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी केला आणि अथक परिश्रमांच्या जोरावर दहावीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली.त्या परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना भरारी पथक आले की काय असेच वाटायचे.त्यांच्या जिद्दीने आणि आत्मविश्वासाने इतर विद्यार्थ्यांनाही मोठी प्रेरणा मिळून सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.या यशाबद्दल पाटणकर यांचे प्रकल्प अधिकारी सौ.शारदा जाधव मॅडम व स्टाफ,तडवळे येथील सरपंच,उपसरपंच, सदस्य,ग्रामस्थ मंडळ पुणे,मुंबई,विविध मंडळे, प्रगतीशील शेतकरी रमाकांत झांजुर्णे नांगरे- पाटील यांनी विशेष अभिनंदन केले.पाटणकर कुटुंबासाठी हा क्षण आनंददायी व अभिमानास्पद ठरला आहे.
