
बीड जिल्ह्यातील माजलगाव-परभणी राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या सुमारास एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. छोटेवाडी गावाजवळ भरधाव कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एका २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, कारने रस्त्यावर तब्बल चार ते पाच वेळा पलट्या घेतल्या.
रात्री २.२५ वाजता काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री २.२५ वाजण्याच्या सुमारास घडली. एक स्विफ्ट डिझायर कार माजलगावकडून परभणीच्या दिशेने जात असताना छोटेवाडी फाट्याजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. वेग जास्त असल्याने कार रस्त्यावरून घसरली आणि तिने एकापाठोपाठ एक अशा चार ते पाच पलट्या घेतल्या. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
