
रायगड जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मंत्री आणि शिंदेसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी अखेर महाड शहर पोलीस ठाण्यात सरेंडर केलं आहे. नगर पालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्याप्रकरणी विकास गोगावले यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून ते पोलिसांना हवे होते. मात्र ते फरार होते. या प्रकरणी हायकोर्टाने प्रशासनाला झापल्यानंतर विकास गोगावले अखेर पोलिसांसमोर हजर झाले.
नेमकं प्रकरण काय?
गेल्या महिन्यात, २ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रात नगर पालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडले. महाडमध्ये मतदान सुरू असताना प्रभाग क्रमांक दोनमध्ये मोठा राडा झाला होता. यावेळी शिंदेसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. या राड्यादरम्यान विकास गोगावले यांनी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला होता. तसेच रिव्हॉल्व्हर रोखल्याचा देखील आरोप करण्यात आला होता.
