पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना दिलासा : प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे
कोरेगाव : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याचा अखेर दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या यापूर्वीच्या यादीत कोरेगाव तालुक्याला स्थान मिळाले नसल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. मात्र, शिवसेनेने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली आणि हा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे मांडला. त्यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने कोरेगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केल्याची माहिती शिवसेना नेते तथा कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिली.
राज्य शासनाने यापूर्वी राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले होते. मात्र, या यादीत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याचा समावेश नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले असतानाही तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीत स्थान मिळाले नसल्याने या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. वाठार स्टेशन परिसरासह जांब बुद्रुक, भिवडी पुनर्वसित, त्रिपुटी, दरे पुनर्वसित आणि तालुक्यातील इतर गावांमध्ये दुष्काळाची तीव्रता जाणवत असल्याचे निदर्शनास आले. अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या परिस्थितीचा अहवाल पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सादर करण्यात आला. देसाई यांनीही या प्रश्नाची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत वस्तुस्थिती पोहोचवली.
दुष्काळ निश्चितीच्या ‘ट्रिगर-१’ निकषांमध्ये कोरेगाव तालुक्याचा समावेश झाला नव्हता. मात्र, पावसाच्या कमतरतेमुळे पिकांवर आणि वनस्पतींवर झालेल्या प्रत्यक्ष परिणामांचा विचार करणाऱ्या ‘ट्रिगर-२’ निकषांनुसार तालुक्याचा समावेश करण्याची मागणी शिवसेनेने केली होती. कोरेगाव तालुक्यातील परिस्थिती लक्षात घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शेतकरी व नागरिकांना दिला होता. यासंदर्भात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या.
या मागणीसाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर शासनाने कोरेगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुष्काळग्रस्त म्हणून समावेश झाल्यामुळे शासनाच्या निर्णयानुसार पात्र लाभार्थ्यांना विविध सवलती आणि मदत उपाययोजनांचा लाभ मिळणार आहे. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीककर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जवसुलीला स्थगिती, कृषिपंपांच्या चालू वीजबिलात सवलत आणि शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी यांचा समावेश आहे.
याशिवाय रोजगार हमी योजनेंतर्गत कामांचे निकष शिथिल करून अधिकाधिक कामे सुरू करणे, गरजेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, टंचाईग्रस्त गावांतील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीजजोडणी खंडित न करणे, शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्य उपलब्ध करून देणे, जनावरांसाठी पुरेसा चारा आणि पाणी उपलब्ध करणे, जलसंधारणाची कामे हाती घेणे तसेच पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे अशा उपाययोजनांचा समावेश आहे.
कोरेगाव तालुक्याच्या दुष्काळग्रस्त यादीतील समावेशामुळे सर्वसामान्य शेतकरी, दूध उत्पादक, शेतमजूर आणि ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची दखल घेऊन शासनाकडे पाठपुरावा केल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय मिळाल्याची भावना असून, शिवसैनिकांमध्येही समाधानाचे वातावरण असल्याचे प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी सांगितले.
