कोरेगाव दि. ९ : (प्रतिनिधी) वाठार स्टेशन येथील जवान विक्रम दोरके (वय ३५) यांचे आज सकाळी ६ वाजता पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या निधनाने वाठार स्टेशन परिसरावर शोककळा पसरली आहे.
सोमवार (दि,१७) ऑगस्ट रोजी विक्रम दोरके हे वाठार स्टेशन येथून पुण्याच्या दिशेने जात असताना शिरवळ येथे त्यांच्या कारचा अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गेल्या दोन महिन्यांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या विक्रम दोरके यांची गुरुवार (दि,८) रोजी सकाळी ६ वाजता प्राणज्योत मालवली.
विक्रम दोरके हे इंडियन आर्मीच्या १३ महार रेजिमेंटमध्ये हवालदार पदावर कार्यरत होते. त्यांनी आपल्या सैन्यसेवेच्या काळात गुजरात, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, सिक्कीम तसेच सध्या पुणे येथे देशसेवा बजावली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी कर्तव्याला प्राधान्य देत देशसेवा केली.
घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी इंडियन आर्मीमध्ये भरती होण्याचा निर्णय घेतला. मेहनत, जिद्द आणि देशसेवेची भावना यांच्या जोरावर त्यांनी सैन्यात हवालदार पदापर्यंत मजल मारली. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ आणि १० वर्षांची मुलगी (समृद्धी) असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या विक्रम दोरके यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान या दुःखद घटनेबद्दल वाठार स्टेशन येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती, सायंकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान विक्रम दोरके यांच्या पार्थिवास भाऊ निखिल याने मुखाग्नी दिली. यावेळी सातारा पोलीस दल तसेच १०९ टी ए मराठा बटालियन कोल्हापूर यांच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून दोरके यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सातारा, वाठार स्टेशनचे आजी-माजी सैनिक,आमदार सचिन पाटील, आरपीआय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य अमित चव्हाण, पंचायत समिती सदस्य अनिता भोईटे, ज्येष्ठ नेते अंकुशराव जाधव,पंचायत समितीच्या माजी सभापती रुपाली जाधव, कोरेगावचे प्रांताधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार संगमेश कोडे, गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, जिल्हा सैनिक कल्याण दत्तात्रय फडतरे, कमांडर मनोज तायडे,
ग्रामपंचायत वाठारच्या प्रशासक सीमा चव्हाण, तसेच उत्तर कोरेगाव पत्रकार संघटनेचे पदाधिकारी आदींनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सातारा, वाठार पोलिस स्टेशन, महसूल विभाग, नातेवाईक, मित्रपरिवार, आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशसेवेत आपले आयुष्य वाहून घेतलेल्या जवान विक्रम दोरके यांच्या निधनाने वाठार स्टेशन परिसरात शोककळा पसरली असून, त्यांच्या देशसेवेबद्दल नागरिकांकडून आदरांजली व्यक्त करण्यात येत आहे.
