
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील ममदापूर गावात शेतीच्या आणि पाण्याच्या वादातून एका सासऱ्याने आपल्या सुनेला लाकडी काठीने बेदम मारहाण केली आहे. या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शेतातून पाणी घेण्यावरून वाद
मिळालेल्या माहितीनुसार, ममदापूर येथील गुडघे कुटुंबात शेतातील सामायिक विहिरीवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी मनीषा गुडघे या विहिरीतून पाणी घेण्यासाठी गेल्या असता, त्यांचे सासरे बबन गुडघे यांनी त्यांना विरोध केला. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात सासऱ्याने जवळच असलेली लाकडी काठी घेऊन सुनेवर अचानक हल्ला चढवला. त्याने सुनेला अमानुष मारहाण केली.
