अधीस्वीकृतीधारक पत्रकारांना आर्थिक फटका
सातारा : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 सप्टेंबर 2026 पासून NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, कार्डच्या अंमलबजावणीदरम्यान निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी आणि प्रवाशांच्या तक्रारी लक्षात घेऊन महामंडळाने या नियमात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.हे बदल होत असताना अधीस्वीकृती धारक पत्रकारांना एस टी सवलत मधुन बाहेर काढलं आहे त्या मुळे 1सप्टेंबर पासून अश्या पत्रकारांना पूर्ण तिकीट देऊन प्रवास करावा लागत आहे.या बाबत महामंडळाने पत्रकार सवलत योजना पूर्ववत करावी.
ज्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी NCMC कार्डसाठी नोंदणी केली आहे; मात्र अद्याप त्यांना कार्ड प्राप्त झालेले नाही, अशा प्रवाशांना नोंदणीची पावती ग्राह्य धरून सवलतीच्या मॅन्युअल तिकिटावर प्रवास करण्याची मुभा 30 सप्टेंबर 2026 पर्यंत देण्यात आली आहे.
तसेच, ज्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी प्रवासाचे तिकीट ऑनलाइन आरक्षित केले आहे, त्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून NCMC कार्ड अनिवार्य न करता आरक्षित तिकिटावर सवलतीच्या दरात प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
गणेशोत्सवातील ग्रुप बुकिंगलाही सवलत
गणेशोत्सवासाठी करण्यात आलेल्या किंवा करण्यात येणाऱ्या ग्रुप बुकिंगमध्ये सहभागी ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनाही NCMC कार्डची सक्ती करण्यात येणार नाही. अशा प्रवाशांना आरक्षित तिकिटावर पूर्वीप्रमाणे सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे.
ज्या लाभार्थ्यांकडे Active NCMC Card आहे, त्यांना मात्र त्याच कार्डच्या माध्यमातून सवलतीचे तिकीट देण्यात येणार आहे.
सर्व्हरवरील वाढलेल्या ताणामुळे अडचणी
1 सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य केल्यामुळे सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या कार्ड प्रणालीवर आली. त्यामुळे NCMC कार्ड कार्यप्रणालीच्या सर्व्हरवरील Hits मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रवासादरम्यान सवलतीचे तिकीट देताना तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी प्रवाशांकडून तक्रारी प्राप्त होत असल्याचे महामंडळाच्या निदर्शनास आले.
या पार्श्वभूमीवर 14 सप्टेंबर 2026 पर्यंत सवलतधारक ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना सवलतीच्या मॅन्युअल तिकिटावर प्रवास करण्याची अनुमती देण्यात आली आहे. याबाबत एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी संबंधित अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.
NCMC कार्डच्या अंमलबजावणीमुळे प्रवाशांना होणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी महामंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना गणेशोत्सवाच्या काळात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
