हिल मॅरेथॉनमध्ये पुन्हा मृत्यू!
२०२२ मध्ये कोल्हापूरचा राज पटेल; आता पुण्याचे संजय कदम — धावपटूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सातारा | प्रतिनिधी
साताऱ्याच्या लौकिकात भर घालणाऱ्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनला ग्रीनीज बुकात घेऊन जाताना या आयोजन समिती बाबत आता प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे 2022 नंतर पुन्हा एकदा यामॅरेथॉनला दुर्दैवी घटनेचे गालबोट लागले आहे. रविवारी झालेल्या स्पर्धेत पुण्याचे धावपटू संजय शामराव कदम यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कदम यांना धावताना अचानक त्रासजाणवल्यानंतर वैद्यकीय मदत देण्यात आली; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.मात्र या घटनेने एक जुना प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
२०२२ मध्ये याच सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये कोल्हापूरचे ३२ वर्षीय राष्ट्रीय टेबल टेनिसपटू राजक्रांतीलाल (राज) पटेल यांचा धावताना मृत्यू झाला होता. स्पर्धेदरम्यान ते अचानक कोसळले आणि त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाला.
एकच स्पर्धा… दोन दुर्दैवी मृत्यू!
चार वर्षांच्या अंतराने घडलेल्या या दोन घटनांमुळे हिल मॅरेथॉनमधील धावपटूंच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने तपासण्याची वेळ आली आहे.
हिल मॅरेथॉनचा डोंगराळ आणि चढ-उताराचा मार्ग धावपटूंसाठी शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक असतो. त्यामुळे अशा स्पर्धेत वैद्यकीय सुविधा, आपत्कालीन प्रतिसाद, रुग्णवाहिका आणि मार्गावरील वैद्यकीय पथकांची कार्यक्षमता अत्यंत महत्त्वाची ठरते.
संजय कदम यांच्या मृत्यूने आता केवळ हळहळ व्यक्त करून प्रश्न संपणार नाही. २०२२ मधील राज पटेल यांच्या घटनेपासून यंदाच्या घटनेपर्यंत सुरक्षा व्यवस्थेत नेमके काय बदल झाले? त्यातून काय धडे घेतले गेले? आणि आता पुढे काय उपाययोजना केल्या जाणार? या प्रश्नांची उत्तरे प्रशासन आणि आयोजकांनी स्पष्टपणे देण्याची गरज आहे.
भव्य आयोजनापेक्षा ‘सुरक्षित आयोजन’ महत्त्वाचे!
सातारा हिल मॅरेथॉनची देशभरात वेगळी ओळख आहे. देश-विदेशातून धावपटू या स्पर्धेत सहभागी होतात. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन केवळ भव्य असणे पुरेसे नाही; प्रत्येक धावपटू सुरक्षितपणे धावून घरी परतणे हेच आयोजनाच्या यशाचे खरे मापदंड असायला हवे.
संजय कदम यांच्या मृत्यूचे वैद्यकीय कारण आणि संपूर्ण घटनाक्रम अधिकृतपणे स्पष्ट होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर २०२२ मधील राज पटेल यांच्या मृत्यूच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या सुरक्षा व्यवस्थेचेही स्वतंत्रपणे परीक्षण झाले पाहिजे.
आता तरी धावपटूंच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य मिळणार का?
दोन घटनांनी एक गंभीर संदेश दिला आहे—
मॅरेथॉनचा वेग कितीही मोठा असो, पण धावपटूंच्या सुरक्षिततेपेक्षा मोठे कोणतेही आयोजन असू शकत नाही.
भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी वैद्यकीय आणि आपत्कालीन व्यवस्थेचा सखोल आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
मृत धावपट्टूस आर्थिक मदत मिळावी
2022मध्ये कोल्हापूर मढील धावपट्टू मृत पावला त्याला आयोजकानी किती मदत केली आणि काल मृत झालेले संजय कदम यांना किती मदत देणार हे आयीजन समिती ने जाहीर कराव.
