सातारा, दि. १६ (प्रतिनिधी) – पर्यटनस्थळाचा क वर्ग दर्जा असणाऱ्या चवणेश्वर (ता. कोरेगाव) गावात दोन दिवसांपासून दोन रानगव्यांनी शिरकाव केला आहे. गावच्या परिसरात गवे दाखल झाल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. याबाबत वनविभागाने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
वाई व कोरेगाव तालुक्याच्या सीमेवर चवणेश्वर हे गाव वसले आहे. निसर्गसंपदेने नटलेले हे गाव असल्याने या गावास शासनाने पर्यटनस्थळ क वर्ग दर्जा दिला आहे. डोंगर व जंगलमय परिसर असल्याने याठिकाणी कायमच वन्य प्राण्याचा वावर राहिला आहे. हे प्राणी कायमस्वरुपी याठिकाणी वास्तव्य करत नसले तरी अधूनमधून याठिकाणी हे प्राणी निदर्शनास येत आहेत. आधीच या गावास वानर व माकडांच्या टोळींचा उपद्रव सुरु असतानाच आता तर रानगव्यांनी गाव परिसरात शिरकाव केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गेल्या दोन दिवसांपासून दोन रानगवे गावाच्या परिसरात दिसत आहेत. धिप्पाड शरीरयष्टी असल्याने या रानगव्यांचा काही उपद्रव होइल का अशी भिती ग्रामस्थांमध्ये आहे. याबाबत वनविभागाने आवश्यक त्या उपाययोजना करुन ग्रामस्थांना धीर द्यावा, अशी मागणी होत आहे.
