कोरेगाव दिनाक : सातारारोड जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सौ. सारिका रत्नदीप फाळके यांची सातारा जिल्हा परिषदेच्या दोन महत्त्वाच्या समित्यांवर – अर्थ समिती तसेच महिला व बालकल्याण समिती – सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या कार्याला नवे बळ मिळाले आहे. जिल्हा परिषदेमधील विविध विषय समित्यांच्या निवड प्रक्रियेत सौ. सारिका फाळके यांच्यावर सर्वानुमते विश्वास दर्शवण्यात आला. अर्थ समिती ही जिल्हा परिषदेच्या आर्थिक नियोजन, निधीचे वाटप आणि विकास कामांच्या प्राधान्यक्रमासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तर महिला व बालकल्याण समितीमार्फत महिलांचे सक्षमीकरण, बालकल्याण योजना, पोषण व शिक्षणाशी संबंधित उपक्रम राबवले जातात.
सौ. सारिका फाळके यांचे पती श्री. रत्नदीप फाळके हे गेल्या अनेक वर्षांपासून आमदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सातारारोड परिसरात सामाजिक व विकासकामांमध्ये सक्रिय असून, विविध लोकहिताच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. सौ. सारिका फाळके यांच्या या निवडीमुळे सातारारोड गटातील प्रलंबित विकास कामांना गती मिळेल, तसेच महिला व बालकल्याणाच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे राबवल्या जातील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, सौ. सारिका फाळके यांनी या निवडीबद्दल सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांचे आभार मानत, “माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करेन. तसेच आमदार महेशदादा शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रियाताई शिंदे व डॉ. अरुणाताई बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेन. व सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आणि विशेषतः महिला व बालकांच्या कल्याणासाठी अधिक प्रभावीपणे काम करणार आहे,” अशी प्रतिक्रिया दिली
.
