कोरेगाव, दि. २२ : दिल्ली बाजारपेठेत जीआय मानांकन मिळवलेले तसेच सातारा जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या घेवड्याचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश करावा, घेवड्याला हमीभाव निश्चित करावा आणि घेवडा पिकाची विशेष ब्रँड म्हणून ओळख निर्माण करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन भाजप युवा नेते अमित भोईटे यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना दिले.
यावेळी कृषी मंत्री भरणे यांनी या सर्व मागण्यांबाबत शासन निश्चितपणे सकारात्मक विचार करेल, असे सांगितले. तसेच घेवडा पिकाचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश करण्यासाठी लवकरच केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कोरेगाव तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील जवळपास २० हजार शेतकरी दरवर्षी सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रावर घेवडा पिकाचे उत्पादन घेतात. मात्र घेवडा पिकासाठी निश्चित बाजारपेठ उपलब्ध नसणे, तसेच घेवडा साठवण्यासाठी शीतगृहांची कमतरता यामुळे हे नगदी पीक अडचणीत आले आहे. त्यामुळे घेवडा उत्पादक शेतकऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे अमित भोईटे यांनी कृषिमंत्री भरणे यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावर कृषिमंत्री भरणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत टप्प्याटप्प्याने सातारा जिल्ह्यातील या महत्त्वाच्या नगदी पिकाला विशेष दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.
घेवडा पिकासाठी अमित भोईटे यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच या पिकाला शासनाची मान्यता व विशेष स्थान मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असेही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी घेवडा उत्पादक शेतकरी किरण भोईटे, एबी माझाचे प्रतिनिधी निलेश बुधावले, पत्रकार जलालभाई पठाण, पत्रकार अतुल वाघ आदी उपस्थित होते.
